पार्थ पवार Vs आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे राजकारणी नेहमी म्हणत असतात. पण हे कितपत खरे आहे हे आपण वेळोवेळी बघत असतो. शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारही राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहे. पार्थ पवारांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठातील अनेक समस्या घेऊन पार्थ पवार राज्यपालांकडे गेले होते.
आदित्य ठाकरे सध्या परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची पाहणी करत असून ते अभ्यास पूर्वक राजकारण करत आहे. आणि लवकरच पूर्णपणे सक्रिय होणार असल्याचे चित्र दिसत आहे. तर अजित पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने चांगलेच प्रोजेक्ट केले आहे. विशेष म्हणजे, मावळ मतदारसंघामधून पार्थ लोकसभेची निवडणूक लढवणार, या चर्चेला सध्या उधाण आलेले आहे. त्यातच राज्यपालांची भेट घेऊन पार्थ यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरु झाली आहे.
मुंबई विद्यापीठातील समस्यासांठी याआधीही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिष्ठमंडळ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटले होते. मात्र, आज पहिल्यांदाच पार्थ पवार यांनी मुंबई विद्यापीठाच्या समस्यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली आहे. याआधी विद्यार्थ्यांच्या समस्याबाबत मुंबईत आदित्य ठाकरे हे सक्रिय असतात .
गतवर्षी सिनेट निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या मुंबई विद्यापीठात  १० पैकी १० जागा आदित्यने निवडून आणल्यानंतर आदित्य ठाकरे युवा नेतृत्व म्हणून नावारूपास आले होते.
परंतु पार्थ पवार हे विद्यापीठासंदर्भातील समस्या घेऊन राज्यपालांकडे गेल्याने मुंबईत विद्यार्थ्यांचे नेते म्हणून पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे अशी टक्कर पाहायला मिळू शकते.