Maharashtra Budget 2021 : अजित पवारांनी सादर केलेल्या Budget वर सुपूत्र पार्थ पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात राज्यातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. अर्थसंकल्पावर राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही वडिलांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना संकटाचा राज्याच्या बजेटवर परिणाम झाला असतानाही अर्थसंकल्पात विकासाच्या सर्वच गोष्टींना प्राधान्यक्रम दिला असून ही उल्लेखनीय बाब आहे. या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

 

 

 

दरम्यान कोरोनामुळे आर्थिक नियोजन कोलमडले असताना 10 हजार 226 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज, घरखरेदीत महिलांना 1 टक्का सवलत जाहीर करतानाच महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणास सरकारने प्राधान्य दिले आहे. महिलांना मुद्रांक नोंदणीत सवलत दिल्याने होणारे आर्थिक नुकसान दारूच्या किमतीत मोठय़ा प्रमाणावर वाढ करून भरून काढण्यात येणार आहे.