पार्थ पवारांचा आत्मविश्वास झाला जागा ; केलं ‘हे’ आवाहन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणूकीसाठी मावळमधून राष्ट्रवादीचे पार्थ पवार उभे आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी पार्थ पवार यांचे दुसरे भाषण झाले. त्यांच्या या भाषणात त्यांनी आपल्या आजोबांना म्हणजे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान बनवण्याबद्दल मत व्यक्त केले आहे. यांच्या या भाषणात त्यांनी कोणतीही चिठ्ठी हातात न घेता, माईक हातात घेऊन न अडखळता आणि प्रवाहीपणे थोडक्यात भाषण केले.

आता आपल्याकडे फक्त ३५ दिवस राहिले आहेत. आता सर्वांना एकत्र मिळून काम करायचंय. आपल्याला आजोबांना पंतप्रधान बनवायचंय. हेच आपल्या सर्वांचे ध्येय आहे, असं आवाहन पार्थ पवार यांनी यावळी केले. हे भाषण करताना पार्थ पवार यांच्यात आत्मविश्वास जाणवला. श्रोत्यांनीदेखील त्यांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाने काम केलंय, ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे. जर नरेंद्र मोदी गुजरातमधील विकासकामे भारतभर मांडू शकतात, तर आपण पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाहीत? मी १८ वर्षांचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर लग्नही झालं असतं माझं. उगाचच मी मुंबईत वेळ घालवला, असं पार्थ पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार्थ यांनी केलेल्या भाषणाची खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागले होते. मात्र, सर्वांना चकित करत पार्थ पवारांनी न अडखळता जोरदार भाषण केले. त्यामुळे पार्थ यांच्यात आता आत्मविश्वास आल्याचे दिसून येत आहे.