पार्थ पवारांच्या उमेदवारीने श्रीरंग बारणे अडचणीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले. पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना कडवे आव्हान मिळणार आहे. पार्थ पवारांना विजयी करण्यासाठी पवारांची ‘पॉवर’ मावळात पणाला लागणार आहे. पवारांचा नातू या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे.

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याने पक्षातर्फे मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पार्थ पवार यांच्या समोर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे आव्हान आहे. मावळ मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. मावळ लोकसभा मतदार संघात घाटा खालील आणि घाटा वरील अशा दोन विभागात मावळ मतदारसंघ विखुरला आहे. घाटाखालील तीन मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. तर घाटावरील तीन मतदारसंघात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे प्राबल्य आहे.

२०१४ च्या मोदी लाटेमध्ये सुद्धा श्रीरंग बारणे हे फक्त १ लाख ५७ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. शरद पवार व अजित पवार हे पार्थ पवारसाठी आणि पवार कुटुंबीयाच्या प्रतिष्ठेसाठी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढतील. सध्या मावळ मतदार संघात भाजप शिवसेनेचे मिळून पाच आमदार आहेत. आणि राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे आमदार आहेत. या निवडणुकीत पार्थ पवारांना शेकाप व अन्य पक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. लक्ष्मण जगताप जरी भाजपचे असले तरी पूर्वाश्रमीचे ते राष्ट्रवादीचे होते. भाजप-शिवसेना युती असली तरी लक्ष्मण जगताप आणि बारणे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्या विरोधात लक्ष्मण जगताप काम करतील अशी चर्चा सध्या मावळात आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप हे वरुन जरी भाजपचे असले तरी ते पार्थ पवार यांना मदत करतील असे देखील बोलले जात आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप हे शेकाप तर्फे उभे राहुन सुद्धा त्यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मते मिळाली होती. आणि राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार २९३ मते मिळाली होती. आपचे मारुती भापकर यांना ३० हजार ५६६ मते मिळाली होती. पार्थ पवार हे जर निवडणुकीत उभे राहिले तर या सर्वांची गोळाबेरीज ५ लाख ६७ हजार ६८८ होते. आणि श्रीरंग बारणे यांना ५ लाख १२ हजार २२६ मते मिळाली होती. पार्थ पवार असल्यामुळे येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सरळ सरळ सामना रंगण्याची शक्यता आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी घाटाखालील तीन मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यापैकी एक पाणी प्रश्नाचा महत्वाचा प्रश्न श्रीरंग बारणे यांनी सोडवला आहे. मात्र, श्रीरंग बारणे राहत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील पाणी प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. त्यामुळे या ठिकाणच्या मतदारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.

खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. श्रीरंग बारणे यांच्याकडून जगताप यांच्याबाबत अद्यापही युती अथवा भाजप नेते सेनेचेच काम करतील असे कोणीही जाहीर वक्तव्य केले नाही. त्यामुळे जगताप जरी युतीचा धर्म पाळणार असे म्हणत असले तरी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले नगरसेवक, पदाधिकारी-कार्यकर्ते नेमके कोणाचे काम करणार याबाबत संभ्रम कायम आहे.

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडचे नेतृत्त्व पवार कुटुंबीयांनी केले आहे. आता पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात येत आहे. त्यांच्यासाठी मावळ मतदारसंघ अनुकूल ठरेल, अशी राजकीय गणिते मांडण्यात आली. त्यानुसार पार्थ यांनी या मतदारसंघात पक्षबांधणीवर भर दिला. सततच्या दौऱ्यांमुळे ते चर्चेतही आले.

‘उठ पार्था जागा हो’ असे प्रोत्साहन देऊन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे आवाहन केले. त्यानंतर मावळमधून पार्थच पक्षाचे उमेदवार असतील, असा दावा राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केला होता. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच माढ्यामधून लोकसभा निवडणूक न लढविता मावळमधून पार्थ यांना संधी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे मावळ मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like