पार्थ पवारांनी दिल्या राम मंदिराला शुभेच्छा, खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या ती वैयक्तिक भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘जय श्रीराम’चा नारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राम मंदिर उभारणीचे स्वागत करणारे खुले पत्र लिहलं आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह प्रकरणावरुन सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांनी आता राम मंदिरावर आपली भूमिका व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधान आलं आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राम मंदिराबाबत पार्थ पवार यांनी लिहलेल्या पत्राबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मी हे पत्र पहिल्यांदा बघते, आम्हाला ते पत्र लिहलेलं नाही. खरंच हे लिहलं असेल तर ती पार्थ यांची वैयक्तिक भूमिका आहे. यावर पक्षाचा लोगो नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पत्रात पार्थ पवार म्हणतात…

भारतीय नागरिकांच्या श्रद्धा व सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्रीराम अखेर आपल्या घरात येत आहेत. एका ऐतिहासिक क्षणा जवळ आपण आले आहोत. लोकशाहीत एखाद्या मोठ्या वादावर सामंजस्याने व शांततापूर्ण मार्गाने तोडगा कसा काढला जाऊ शकतो. हे रामजन्म भूमी प्रकरणातून दिसून आलं. यातून बोध घेऊन विजयाच्या क्षणीही आपण नम्र असायला हवे. या वादात पराभूत झाल्याची ज्यांची भावना आहे, त्यांनाही सोबत पुढे घेऊन जायला हवे. अयोध्येत रामलल्लाच्या हक्काचे जे होते, ते मिळाले आहेत” असं पार्थ पवार यांनी पत्रात आपले मत मांडले आहे.