पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी पार्थ पवारांचा शब्द ठरला ‘वजन’दार, राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याबाबतचे पत्र सोमवारी (दि.7) नगरसचिवांकडे देण्यात आले. आता केवळ विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतर नाव घोषित करण्याची औपचारीकता उरली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भोसरीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र,भोसरीत प्रतिस्पर्ध्याला ताकद मिळू नये म्हणून भाजप आमदार महेश लांडगे यांची मैत्री राजू मिसाळ यांच्या पथ्यावर पडली आहे. आणखी यात भर आणि आश्चार्याचा धक्का म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही राजू मिसाळ यांच्या नावाची शिफारस केल्याने विरोधी पक्षनेते पदासाठी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मिसाळ यांनी राष्ट्रवादीतर्फे सोमवारी अर्ज दाखल केला आहे.

नाना काटे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला होता. यानंतर या वेळेस अजित गव्हाणे, राजू मिसाळ, वैशाली घोडेकर ही नावे चर्चेत होती. त्यामध्ये भोसरीत राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद वाढवण्यासाठी व आमदार महेश लांगडे यांना शह देण्यासाठी अजित गव्हाणे यांना संधी मिळण्याची जोरदार शक्यता होती. मात्र, पडद्या मागील काही राजकीय घडामोडींनी राजू मिसाळ यांचे नाव उचलून धरण्यात आले. तसेच त्याचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याशी असलेली मैत्री व पार्थ पवार यांनी शिफारस केल्याने विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत कामी आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.