ठाकरे सरकारकडून ‘ब्रेक दि चेन’ आदेशात अंशतः बदल ! आता परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या ‘या’ व्यक्तींना ‘RT-PCR’ ची गरज नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 मे पासून लागू केलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशानुसार, मालवाहतुकीसाठी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकचालकांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (दि.15) या आदेशात बदल करण्यात आले असून आता परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांना ‘RTPCR’ची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेशानुसार, मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारण: दोनपेक्षा जास्त लोक (एक चालक आणि एक क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी तीन व्यक्ती (दोन चालक आणि क्लीनर अथवा मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. मालवाहक महाराष्ट्राबाहेरून येणार असतील तर त्यांच्या शरीराचे तापमान व इतर लक्षणे तसेच ‘आरोग्य सेतू’ मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच प्रवेश मिळेल. एकालाही कोरोनाची लक्षणे आढळल्यास सर्वांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल.

शासनाच्या या निर्णयामुळे वाहतूकदार, ट्रकचालकांना दिलासा मिळेल. तसेच पुरवठा साखळी सुरळीत राहण्यास मदत होईल, असे जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वनवे यांनी सांगितले.