नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यस्थानमध्ये आज चांगलीच राजकीय उलथापालथ पहायला मिळाली. राजस्थानचे सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत तीन अन्य मंत्र्यांना मंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पायलट यांची मनधरणी केली. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांना पदावरून हटवल्याची घोषणा केली. तसेच त्यांच्यावर टीका करताना काँग्रेस पक्षाने त्यांना लहान वयात खूप काही दिल्याची आठवण करून दिली.
जयपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले, आम्हाला एका गोष्टीचे दु:ख आहे, की उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही आमदार आणि मंत्री भ्रमित होऊन भाजपच्या षडयंत्रात अडकले आणि काँग्रेस सरकार पाडण्यासाठी तयार झाले.
सुरजेवाला यांनी यावेळी म्हणाले की, सचिन पायलट यांना काँग्रेसने कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. सचिन पायलट यांना अगदी कमी वयात जी राजकीय ताकद दिली गेली, तेवढी ताकद कदाचित कुणालाही दिली गेली नसेल.
2003 मध्ये सचिन पायटल राजकारणात आले. यानंतर 26 वर्षाचे असतानाच 2004 मध्ये त्यांना काँग्रेसने खासदार बनवले. 32 व्या वर्षी त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. 34 व्या वर्षी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. आणि 40 व्या वर्षी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव त्यांच्यासोबत होता. त्यामुळेच त्यांना हे सर्व मिळाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.