उमेदवारी दिली तर लोकसभा लढवणार : संजीवराजे नाईक-निंबाळकर

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ही निवडणूक ते लढवतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस आघाडीचा जो उमेदवार दिला जाईल. त्याचे सुद्धा काम केले जाईल. तसेच शरद पवार जो निर्णय देतील, त्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, असं त्यांनी सांगितलं. माढा लोकसभा मतदार संघातून माजी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव निश्चित झाले आहे का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर संजीवराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, अद्यापपर्यंत कुणाचेही नाव निश्चित झाले नाही.

मात्र शरद पवार जो उमेदवार देतील, त्याचे काम केले जाणार आहे. मागील निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात वेगळी परिस्थिती होती, मात्र यावेळी तशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व राष्‍ट्रीय काँग्रेस एकत्रीत येवून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात उसाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.