काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष जनतेचा विचार करणारे, त्यांच्यासोबत काम करणं सोपं : आदित्य ठाकरे

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा – 2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या तरुण आमदारांसह सुसंवाद साधण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं सोपं आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेत महाविकासआघाडी एकत्र लढण्याबाबत देखील संकेत दिले.

या कार्यक्रमाचे मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना आगामी निवडणुकांचे संकेत देत मित्रपक्षांशी अशीच दोस्ती कायम असणार का? असा सवाल विचारला. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत. मित्र काँग्रेस-राष्ट्रवादीत होते. विलासराव देशमुखांनी कधीही ग्रेस सोडली नाही. आम्ही विरोधात असतानाही त्यांच्यासोबतच आहोत असे वाटायचे. याशिवाय शरद पवार साहेब आणि माझे आजोबा (बाळासाहेब ठाकरे) यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीत वेगळच प्रेम होते. आता आमचेही वेगळे नाते निर्माण झाले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकांचे पक्ष असे म्हणले जाते, परंतु वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन पक्ष जनतेचा विचार करणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मैत्री, नाती एकत्र आली आहेत. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये बदल घडला आहे. देशाचे चित्र बदलत आहे. भविष्यात आणखी बदल होतील. यातून असे संकेत मिळत आहेत की राज्यात जिल्हा परिषद निवडणूकांपाठोपाठ आगामी काळात मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढू शकतात.

राहुल गांधीच्या भेटीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी राहुल गांधींना भेटलो, त्यांच्याशी बोललो. विचार वेगळे असतील, मात्र विकास हे ध्येय समान आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/