पसायदान ! ‘खराब’ माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट गुणांचा ‘नाश’ करण्याची प्रार्थना, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावातच ‘ज्ञान’ आणि ‘ईश्वर’ असे शब्द आहेत. ज्ञान+ईश्वर = ज्ञानेश्वर. म्हणजेच ज्ञानाचा ईश्वर. ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे आपल्या सर्वांना अगदी तोंडपाठ आहे. अगदी लहानपणापासून आपण शाळेत, मंदिरात, पसायदान ऐकत आलोय. अनेक शाळांच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असतो. संपूर्ण पसायदानात माऊलींनी स्वत:साठी काहीही मागितलेले नाही. जे काही मागितले ते त्यांच्या लेकरांसाठी (विश्वातील संपूर्ण मानव) मागितले. जे वाईट विचारांचे आहेत त्यांच्याबद्दल माऊली म्हणतात,

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥

संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडे मागणे मागतात की, या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या वाईट माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो तर त्याच्यामध्ये असलेले गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेवढे वाईट गुणच काढून टाक आणि त्यांच्यातील वाईटपणा काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील. भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलांची (विश्वातील संपूर्ण मानव) जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल करू शकतो हा त्यांना विश्वास आहे. प्रत्येकाने दररोज किमान एकदातरी पसायदान म्हणावे.

संपूर्ण पसायदान –

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/