‘सरत्या’ वर्षात लाचलुचपतच्या गळाला लागले मोठे ‘मासे’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लाच मागण्याची प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी आता मुळापर्यंत जाऊन कारवाईचा धडका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावला आहे. यंदा लाचेच्या प्रकरणात वर्ग एकच्या पाच अधिकार्‍यांवर कारवाई करीत, त्याची झलकही विभागाने दाखवून दिली आहे.

लाच मागणीमध्ये यंदा महसूल आणि पोलीस विभाग आघाडीवर राहिल्याचे कारवाईतून स्पष्ट झालं आहे. शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील कामे विनाविलंब व्हावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते.
या यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते आहे. पण, त्यासाठी तक्रारी देण्याकरिता नागरिकांना पुढे यावं लागतं. यासाठी विभागाकडून काही वर्षांत अधिक प्रमाणात प्रबोधनाची मोहीम हाती घेतली आहे. त्याला यश मिळत असून, तक्रारीचे प्रमाण वाढू लागलं आहे.

लाचेच्या मागणीबाबतची तक्रार आल्यावर मागणी करणार्‍यासह ती स्वीकारणार्‍यावर सर्वसाधारण कारवाई केली जात होती. पण, विभागाने लाच मागण्याची प्रवृत्ती मुळासकट मोडून काढण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. लाच मागणीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या माशासह प्रत्येक घटकावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 11 महिन्यांमध्ये विभागाने वर्ग एकच्या पाच अधिकार्‍यांना जाळात पकडले आहे.

वर्ग 1 चे पाच अधिकारी अडकले एसीबीच्या जाळ्यात
मत्स्य विभाग, लघुपाटबंधारे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वैद्यकीय अधीक्षक आणि महावितरण विभागातील वर्ग एकच्या पाच अधिकार्‍यांवर यंदा आतापर्यंत लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.