Solapur news : बार्शीमध्ये महिला पोलिसावर प्राणघातक हल्ला, चौघांविरोधात FIR

बार्शी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ड्युटीवरून घरी जाणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बार्शी-तुळजापूर (Barshi-Tuljapur) रस्त्यावरील शेलगावजवळ गुरुवारी (दि.7) सकाळी घडली. रेश्मा सुतार असे जखमी झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी चार जणांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिस शिपाई रेश्मा सुतार या शहरातील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. ड्युटी संपल्यानंतर त्या साकत पिंपरी येथील त्यांच्या घरी स्कूटीवरून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला.

रेश्मा सुतार या कार्यालयीन कामकाज संपवून साकत पिंपरी येथे स्कूटीवरुन घरी जात असताना शेलगावजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरुन पाठीमागून आले आणि त्यांनी स्कूटीला साथ मारली. यामुळे त्या रस्त्याच्या बाजूला पडल्या. रस्त्याच्या बाजूला पडल्यानंतर आरोपी म्हणाले, कर गुन्हा दाखल, माझ्या मेव्हण्यावर गुन्हा दाखल करतेस, असे म्हणून निघून गेले. त्यानंतर त्या गाडी उभी करत असताना दुसरे दोघे दुचाकीवरुन आले. आज तू घरापर्यंत कशी पोचते तेच बघतो, तुला मी आज ठार मारतो असे म्हणत धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. रेश्मा पवार यांनी वार चुकवला. रस्त्यावर वाहने येत असल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले.

या घटनेनंतर रेश्मा पवार यांनी आपल्या पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यांनी रेश्मा पवार यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रेश्मा सुतार यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.