‘डबल’ महाराष्ट्र ‘केसरी’ चंद्रहार पाटील याची तहसिलदारांना मारहाण

सांगली :  पोलीसनामा ऑनलाइन  –  दोनदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकवून संपूर्ण देशात नावलौकीक मिळवलेल्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील चंद्रहार पाटील याने वाळूप्रकरणी दंड कमी करावा म्हणून तहसिलदार ऋषिकेश शेळके यांना मारहाण केल्याचा प्रकार आज (रविवार) दुपारी घडला. याप्रकरणी चंद्रहार आणि त्याच्या साथिदाराविरुद्ध तहसिलदारांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रहार पाटील याच्या अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करत विटा तहसीलदार ऋषीकेश शेळके यांनी साडेसात लाख रुपयाचा दंड ठोठावला होता. या वाळू गाड्यावर केलेली दंडाची रक्कम कमी करावी, ही मागणी अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील करत होता. मात्र, तहसीलदार यांनी सर्व दंड भरा अशा सूचना दिल्या होत्या. हा राग मनात धरुन दुपारच्या सुमारास तहसील आवारातच तहसीलदारांना चंद्रहार पाटील आणि त्याच्या एका साथीदाराने माराहाण केली.

चंद्रहार पाटील याने दोनवेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर हॅटट्रिक पदाची संधी हुकली. त्यानंतरही त्याने ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा मान मिळावा म्हणून जोरदार तयारी केली होती. परंतु दुर्दैवाने त्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होता आले नाही. राजकारणात देखील तो जिल्हा परिषद सदस्य म्हणून एकदा निवडून आला होता. अलिकडे तो मल्लांना मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. विटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल निर्माण करण्याचा मनोदय त्याने केला होता. त्याचे बांधकाम सध्या सुरु आहे. विटा येथे कुस्ती संकुलाचे बांधकाम सुरु असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा केला आहे. या वाळूप्रकरणी तहसीलदार यांनी नुकतीच दंडाची कारवाई केली होती.