10 वी अन् 12 वी च्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करा – राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र आता सरकारने राज्यात कडक निर्बंध लावल्याने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा न घेता पास करण्याचे राज्य सरकारला सुचवले आहे.

यंदा 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच एप्रिल महिन्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करावे अशी मागणी शिवसेनेकडून लोकसभेत करण्यात आली आहे. मात्र दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे. आता त्यांच्या परीक्षा होत आहेत. पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करायला हवे. कारण ते कोणत्या मानसिकतेत असतील हे सांगता येत नाही. ते लहान असून त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा. पहिल्यांदाच आपल्यावर हा प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे मी राज्य सरकारला विनंती करत आहे की, खालच्या विद्यार्थ्यांना पास केले आहे. तसेच 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावे असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.