पास झालो, पण गुणपत्रिकाच नसल्याने प्रवेश घ्यायचा कसा, विद्यार्थी अडचणीत

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बी. कॉम उत्तीर्ण झालो आहे. पुढे एमबीए करण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली. पण अद्याप गुणपत्रिकाच मिळाली नसल्याने पुढची प्रक्रियाच करता येत नाही. अर्ज भरण्यासाठी आज रविवार (दि.13) डिसेंबरची मुदत आहे. पण गुणपत्रिका नसेल तर आमचे वर्ष वाया जाईल, त्यामुळे मुदतवाढ दिली पाहिजे ,असे अक्षय जेरे हा विद्यार्थी सांगत होता. केवळ माझीच अडचण नाही, तर अनेक विद्यार्थ्यांना याच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठानी अंतिम वर्षाच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या. त्याचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्य सरकारने 2020-21 चे शैक्षणिक प्रवेश करण्यासाठी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचे आदेश काढल्यानंतर सीईटी सेलने एमबीए, एमफार्म, एमटेक, एम. आर्किटेक्टरसह इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. यात एमबीए प्रवेशाची नोंदणी करण्यासाठी 13 डिसेंबर तर एमटेक 17 डिसेंबर तर एमफार्म, एमसीएसाठी 16 डिसेंबरची मुदत आहे. विद्यापीठाने निकाल उशीरा लावल्याने राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. तसेच महाविद्यालयाकडून टीसीही देण्यात आली नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांना प्रवेश अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटी सेलच्या हेल्पलाईनला फोन करून मागणी करत आहेत. पण त्यामुळे काहीच निर्णय झालेला नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्याची भीती वाटत आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना काही प्रमाणात अडचणी येत आहेत. पण विद्यापीठाने गॅझेटवर निकाल जाहीर केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून निकाल सर्टीफाय करू शकतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पुर्ण करता येईल, तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही.
चिंतामणी जोशी, आयुुक्त सीईटी सेल.