प्रवासात डुलकी लागली अन् चोरट्यांनी साधला डाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खरं तर ते नेहमी हैदराबाद -मुंबई दरम्यान विमानाने प्रवास करायचे. कारण त्यांच्याकडे असायचे लाखोंचे दागिने. पण, भाऊजी आणि भाचा हे दोघे मुंबईला बसने जाणार होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर बसने जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासात त्यांना डुलकी लागली आणि चोरट्याने डाव साधला.

खासगी बसने हैदराबाद ते मुंबई प्रवासादरम्यान त्यांना ९५ लाख ५० हजार रुपयांचे हिरेजडीत दागिने गमावण्याची वेळ ओढावल्याची घटना डकीस आली आहे.

हैदराबादचे रहिवासी असलेले तक्रारदार योगेशकुमार अगरवाल ( वय ४७) हे हिरे व्यावसायिक आहेत. झवेरी बाजार येथून ते दागिने खरेदी करतात. महिन्यातून एकदा त्यांची झवेरी बाजारात ये-जा असते. त्यांच्याकडून माल खरेदी करायचे आणि विक्री न झालेला माल परत व्यापाऱ्यांना आणून द्यायचा असा त्यांच्यात व्यवहार होत असे. १५ डिसेंबर रोजी त्यांच्याकडून ९८ लाख ५० हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. त्यापैकी ३ लाखांचे दागिने विकले गेले. त्यामुळे त्यांनी उरलेले दागिने परत करण्याचा निर्णय घेतला.

ते दागिने परत करण्यासाठी नेहमी विमानाने प्रवास करतात. मात्र बुधवारी त्यांचे भाऊजी आणि भाचा झवेरी बाजारात मोती खरेदीसाठी बसने जाणार होते, म्हणून तेही त्यांच्यासोबत बसने निघाले. ठरल्याप्रमाणे बुधवारी रात्री त्यांनी बसने प्रवास सुरू केला. त्यांनी दागिने प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून तो डबा कागदात गुंडाळून बॅगेत ठेवला. पुढे झहिदाबाद येथे बस जेवणासाठी थांबली. मात्र दागिने जवळ असल्याने अगरवाल खाली उतरले नाहीत. रात्री साडेबाराच्या सुमारास बस निघाली. तेव्हा त्यांनी दागिने बघितले. ते व्यवस्थित होते.

दागिन्यांच्या विचारात त्यांना कधी डुलकी लागली कळले नाही. गुरुवारी सकाळी वाकडदरम्यान साडेआठच्या सुमारास त्यांना जाग आली. तेव्हा बॅग जवळच होती. मुंबईत उतरल्यानंतर त्यांनी कफपरेड येथील हॉटेल गाठले. तेथे त्यांनी बॅग उघडली, तेव्हा दागिन्यांचा डबा गायब होता. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.