राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची होणार तपासणी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना (COVID-19) चा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पुणे आणि नागपूरमध्ये सर्वात जास्त रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. विदर्भातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार आता अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईत तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली, कुर्ला या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी होणार आहे.

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातही कोरोनाचा हाहाकार वाढताना दिसत आहे. नियमांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन केलं तर ही साखळी तोडली जाऊ शकते. यासाठी सरकारकडून वारंवार मास्क लावण्याचं आणि सामाजिक अंतर ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली, राजस्थान, गुजरात केरळ, गोवा, विदर्भ येथून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईतील ठराविक स्थानकांवर तपासणी केली जाणार आहे.

गेल्या 24 तासात नागपुरात 29 रुग्ण दगावले असून 3679 नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या नागपुरात 27,625 पेक्षा जास्त अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्तांनी जिल्हा हद्दीतील कठोर निर्बंध 31 मार्च पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.