परदेशात जाणार्‍यांना विमानतळावर दाखवावा लागेल QR वाला RT-PCR रिपोर्ट, आजपासून लागू झाला नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नवा नियम जारी केला आहे. त्यानुसार, आता परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर QR Code असलेला RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. तो नसेल तर संबंधित प्रवाशांना विमानप्रवास नाकारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.

विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडून यापूर्वी अधिकाऱ्यांना बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून प्रवास केला जात होता. त्यामुळे आता QR Code असणारा कोरोना रिपोर्ट लॅब आणि व्हॅलिडिटीची माहिती मिळू शकणार आहे. मंत्रालयकडून सांगण्यात आले की, एअरलाईन्स ऑपरेटरांना सूचना दिल्या जात आहेत की 22 मे, 2021 पासून ज्या प्रवाशांच्या RT-PCR रिपोर्टवर QR Code असेल अशा प्रवाशांनाच विमान प्रवासाची मुभा दिली जाणार आहे.

QR Code ची गरज काय?

RT-PCR रिपोर्टवरील सर्व माहिती एका QR Code च्या माध्यमातून समजू शकेल. अशाने बनावट रिपोर्ट घेऊन येणाऱ्या प्रवाशाला विमानतळावरच रोखता येऊ शकेल. पुण्यातील कृष्णा डायग्नोस्टिक्समधील श्रवण मुथा यांनी सांगितले की, लॅबमधील बोगस निगेटिव्ह रिपोर्टपासून वाचण्यासाठी एक प्रयोग केला होता. आम्ही QR कोडच्या माध्यमातून आमच्या पोर्टलवर रुग्णांची पूर्ण माहिती मिळू शकतो.

31 मेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांना बंदी

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत इंटरनॅशनल कमर्शिअल फ्लाईट 31 मेपर्यंत पूर्णपणे बंद आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएई आणि ब्रिटनसह अनेक देशांत उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे.