बनावट क्रमांक टाकून दुचाकी चालवण्यास देणाऱ्यांसह अल्पवयीन चालक ताब्यात

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुणे पोलिसांनी सुरु केलेल्या सुरक्षा पंधरवाडा मोहिमेंतर्गत वारजे वाहतूक पोलीस कारवाई करत असताना एका दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलास पकडले असता चौकशीनंतर तो चालवत असलेल्या दुचाकी वरील क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. पोलिसांनी अल्पवयीनास ताब्यात घेतले असून अल्पवयीनांस गाडी चालवण्यास देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी धनंजय हनुमंत बनसोडे ,करण हनुमंत बनसोडे, व एक १४ वर्षीय अल्पवयीन तिघे (रा. संतोष दगडे चाळ ,पाटील नगर, बावधन ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा अधिकच्या गुन्ह्यांमध्ये काही संबंध आहे का याची चौकशी पोलिस करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा दुचाकी ऍक्टिवा गाडीवरून जात असताना , पोलिसांनी चौकशीसाठी त्याला थांबवले असता त्याच्याकडे परवाना तसेच गाडीचे कुठलेही कागदपत्र आढळले नाही. यानंतर पोलिसांनी तपास केला आता गाडीवरील क्रमांक बनावट असल्याचे लक्षात आले. बनावट क्रमांक टाकून शासनाची फसवणूक करणे , तसेच मागील ८ महिन्यांपासून बनावट क्रमांक टाकून वापरत असलेली दुचाकी काहीतरी गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने गाडी वापरत आहे या अनुषंगाने दुचाकीसह अल्पवयीनास ताब्यात घेतले. यानंतर अल्पवयीन मुलास गाडी चालवायला दिल्यामुळे वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर ,सहायक पोलीस आयुक्त परिमंडळ १, सहायक पोलीस निरीक्षक वारजे वाहतूक विभाग ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार सुवराव लाड,पोलीस हवालदार तानाजी नांगरे ,पोलीस नाईक अविनाश गोपकर ,किरण पवार ,रवींद्र अहिरे ,पोलीस कर्मचारी योगेश वाघ ,सुजय पवार यांनी पार पाडली.