पतंजलीनं बनवलं ‘कोरोना’वरील आयुर्वेदिक औषध, जगासमोर आज लॉन्च करणार

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे. आज पतंजलीचे ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध जगासमोर येणार आहे. आचार्य बालकृष्ण हे दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचे आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्यासह औषध प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केले आहे. आज औषध लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचे उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.

पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. याव्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. यामध्ये 100 टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करोनील हे औषध कोरोनाबाधितांना 5 ते 14 दिवसांमध्ये बरे करू शकते असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे.