केंद्राच्या दणक्यानंतर ‘पतंजली’ने दिले ‘हे’ पुरावे, ‘कोरोना’ 100 % बरा केल्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून शास्त्रज्ञ कोरोना व्हायरस विरोधात औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच पतंजलीने कोरोना व्हायरस विरोधात औषध शोधून काढलं आहे. कोरोनिल या औषधामुळे कोरोना 100 टक्के बरा होतो असा दावा पतंजलीने केला आहे. यानंतर केंद्र सरकारने पतंजलीला दणका दिला होता. आपल्याला या औषधाबाबत काहीही माहिती नाही. आधी सविस्तर माहिती द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवा, असे आदेश पतंजलीला देण्यात आले होते. केंद्राच्या दणक्यानंतर पतंजलीने या औषधाबाबत केंद्र सरकारला पुरावे दिले आहेत.

कोरोनिल औषधाची कोरोना चाचणी घेण्यात आली असून या औषधाचा रिझल्ट हा 100 टक्के आहे. 69 टक्के कोरोना रुग्ण 3 दिवसांमध्ये बरे झाले आहेत. तर 100 टक्के कोरोना रुग्ण सात दिवसांत बरे झाले असल्याचा दावा रामदेव बाब यांनी केला. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले असल्याची माहिती रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने याबाबत सविस्तर अहवाल मागितल्यानंतर पतंजलीने केंद्राकडे पुरावे सादर केले आहेत. आचार्य बाळकृष्ण यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.

आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटले आहे की, हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारं सरकार आहे. जो कम्युनिकेशन गॅप होता तो दूर झाला आहे. औषधाच्या ट्रायलचे स्टँडर्ड पॅरामिटर्स असतात, ते 100 टक्के पूर्ण केलेत. याची माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे.

आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती, त्याचं क्लिनिकल चाचणी कुठे केली, त्याला मान्यता कुणी दिली आणि त्याचा परिणाम काय झाला, याबाबत सविस्तर माहिती अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले होते. तसेच उत्तराखंड राज्याच्या संबंधित परवाना प्राधिकरणालाही या उत्पादनाला परवानगी दिल्याचा तपशील सादर करण्यास सांगितले होते.