बाबा रामदेव यांची पतंजली बिस्किट कंपनी ‘इतक्या’ कोटींना विकली गेली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रुची सोया इंडस्ट्रीज कंपनीने बाबा रामदेव यांची पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खरेदी केली आहे. ६०.६२ कोटींना हा व्यवहार झाला असून १० मेला संचालकांनी हस्तांतर करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात कंपनी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, रुची सोय इंडस्ट्रीजकडून खरेदीची रक्कम दोन हप्त्यात दिली जाणार आहे.ॲग्रीमेंट क्लोझिंग डेटला १५ कोटीचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. तसंच, क्लोझिंग डेटपासून ९० दिवसांत उर्वरित ४५ कोटी रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.

यासंदर्भात रुची सोया कपंनीने माहिती दिली आहे. या माहितीनुसार, या व्यवहारात काही काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ॲग्रीमेंटचाही समावेश आहे. त्यानुसार कंपनीचे कर्मचारी, तसंच कंपनीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची मालकीही हस्तांतरित होणार आहे. त्याचबरोबर रुची सोया कंपनीच्या नावावर पतंजली बिस्कीट कंपनीच्या नावावर असलेली कर्जं, कंपनीची सर्व प्रकारची लायसेन्सेस, परमिट या सगळ्याच गोष्टी होणार आहेत. कंपनी अधिग्रहणाचा उद्देश हा रुची सोया या कंपनीचा सध्याचा प्रॉडक्ट पोर्टफोलियो वाढवणं हा आहे.

न्यूट्रिला, महाकोश, रुची गोल्ड, रुची स्टार, सनरिच अशा ब्रँड्ससह रुची सोय कंपनी भारतात कारभार चालवते. ही कंपनी एकेकाळी कर्जात बुडाली होती. २०१९मध्ये पतंजली आयुर्वेद कपंनीने रुची सोया ही कंपनी चार हजार ३५० कोटींना खरेदी केली. कंपनी विकत घेण्यासाठी पतंजलीला तीन हजार २०० कोटींच कर्ज घ्याव लागल होत. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक हजार २०० कोटी, सिंडिकेट बँकेकडून ४०० कोटी, पंजाब नॅशनल बँकेकडून ७०० कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाकडून ६०० कोटी, तर अलाहाबाद बँकेकडून ३०० कोटी रुपयांचं कर्ज पतंजली कंपनीने घेतलं होतं. त्यामुळे बाबा रामदेव यांच्याच रुची सोया आणि पतंजली नॅचरल बिस्कीट प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्या आहेत. २००६ मध्ये रामदेवबाब आणि आचार्य बालकृष्ण यांनी पतंजली कंपनीची स्थापना केली होती. आता त्या कंपनीची ९९.६ टक्के मालकी आचार्य बालकृष्ण यांच्या नावावर आहे. बाबा रामदेव कंपनीचे सहसंस्थापक आहेत.