पतंजली आता कापड उद्योगात : जीन्सवर दिवाळीनिमित्त खास सवलत 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतजलीची उत्पादने वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. अनेक पतंजलीचे अनेक प्रकारचे उत्पादन बाजारात वापरासाठी उपलब्ध आहेत. अशातच आता योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. आनंदाची बाब अशी की, दिवाळीच्या मुहूर्तावर बाबा रामदेव यांनी ‘पतंजली परिधान’ या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्धाटन केले. महत्त्वाचे म्हणजे उद्धाटन कार्यक्रमात कुस्तीपटू सुशील कुमार, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.  दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये उद्धाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दिल्लीत ओपन करण्यात आलेल्या ‘पतंजली परिधान’मध्ये जीन्स 1100 रुपयांना मिळत आहे. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर 15 टक्क्यांची सवलत देण्यात आली असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले. इतकेच नाही तर येत्या डिसेंबर महिन्यात देशात जवळपास 25 नवीन ‘पतंजली परिधान’ स्टोअर्स ओपन करण्यात येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.
बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्याने ट्विटरच्या माध्यातून सांगितले की, ‘पतंजली परिधान’मध्ये पुरुष, स्त्रिया, लहान मुले, डेनिम, पारंपरिक, कॅज्युअल, फॉर्मल अशा सर्व प्रकारचे 3000 कपड्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये लिवफीट, आस्था आणि संस्कार या ब्रँडचे कपडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्याप्रमाणे खादीने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्त्व केले होते. त्याचप्रमाणे पतंजली देशात आर्थिक स्वातंत्र्य आणेल असे ट्विटमध्ये म्हटले आहे.