पतंजलीचे मार्केट डाऊन… 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतंजलीच्या उत्पादनांनी भल्याभल्या कंपन्यांना घाम फोडला होता. मात्र योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ आयुर्वेद  उत्पादनांना पाच वर्षात पहिल्यांदाच मोठा फटका बसला आहे. पतंजलीच्या उत्पादनांच्या विक्रीत घट झाली आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी (जीएसटी) आणि कमकुवत वितरण व्यवस्थेमुळं कंपनीच्या उत्पादनाची विक्री कमी झाली आहे.

‘केअर रेटिंग’नं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हे वास्तव समोर आलं आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पतंजलीला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात १० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हा महसूल ८,१४८ कोटींपर्यंत खाली घसरला होता. येत्या तीन ते पाच वर्षांत कंपनीची उलाढाल २० हजार कोटींवर नेण्याचा बाबा रामदेव यांचा प्रयत्न होता. २०१२ मध्ये ५०० कोटींपर्यंत मर्यादित असलेला कंपनीचा महसूल २०१६ मध्ये १० हजार कोटींपर्यंत गेला होता.

‘पतंजली’ची स्वत:ची आयुर्वेद चिकित्सालयं असल्यानं सुरुवातीला त्यांच्या उत्पादनांची लोकप्रियता वेगानं वाढली होती. मात्र, पतंजलीची उत्पादने जनरल स्टोअरमध्ये गेल्यानंतर या लोकप्रियतेला ओहोटी लागली. सर्वसामान्य ग्राहक या उत्पादनांकडं इतर उत्पादनांप्रमाणेच पाहू लागला. त्याचा फटका पतंजलीला बसल्याचं बोललं जात आहे.