पाथर्डीत ‘आयात’ भाजप कार्यकर्त्यांत ‘तुंबळ’ हाणामारी ; सुजय विखे अन् पंकजा मुंडे समर्थक ‘भिडले’

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यातून आता अगोदर आलेले व नंतर आलेले अशा भाजपात आयात झालेले नेते आणि कार्यकर्ते यांच्यात अधिक निष्ठावंत कोण यावरुन वादावादी सुरु झाली आहे. त्याचा प्रत्यय माजी आमदार दगडु पाटील बडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आला.

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यासमोरच विखे समर्थक अजय रक्ताटे व पंकजा मुंडे यांचे समर्थक राहुल कारखेले यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली.

मुंडे समर्थक राहुल कारखेले यांनी खासदार विखेंना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. त्यावेळी रक्ताटे यांनी विखे यांना वाहनाकडे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारखेले म्हणाले, रक्ताटे हे काँग्रेसचे आहेत, त्यांचे ऐकू नका. त्याचवेळी रक्ताटे म्हणाले, कारखेले, तुम्ही तरी कुठे भाजपचे आहात? याचा राग आल्याने कारखेले यांनी रक्ताटे यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यांची ही हाणामारी पाहून उपस्थित अवाक झाले. उपस्थितांनी भांडणे सोडविली. परंतु विखे पाथर्डीतून निघून गेल्यानंतर सायंकाळी रक्ताटे यांनी राहुल कारखेले यांच्या दुकानात सहकारी युवकांसोबत जाऊन पुन्हा राडा केला. तसेच कारखेले यांना मारहाण केली. त्यामुळे काही काळ बाजारपेठेत वातावरण तणावपूर्ण झाले होते.

अखेर भाजपच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात फिर्यादी देण्यासाठी पोहचले. पण भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी हे वाद मिटवून त्यावर पडदा टाकला. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी रक्ताटे व कारखेले यांचे भांडण मिटल्याचे जबाब नोंदवून दोघांनाही शांतता राखण्याची समज दिली.