पाथरी-सोनपेठ रस्त्याची दुरावस्था ! रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून ‘चिखलात’ फसला

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पाथरी सोनपेठ रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. असे आहे की रस्त्यात खड्डा आहे किंवा खड्डेमय रस्ता आहे. नेमके हेच कळून येत नाही. पाथरी सोनपेठ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

रस्त्यावर ये – जा करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या अपघाताची घटना घडण्याची वाट पाहत आहे काय असा सर्वसामान्य प्रश्न पडला असेल. असेच म्हणण्याची आता वेळ आली आहे. परभणी येथून पाथरी मार्गे सोनपेठ ला शासकीय गोदामातील सार्वजनिक वितरण रेशनचे धान्य घेऊन जाणारे एमएच 13 ए एक्स 27 37 हा ट्रक पाठी मागील दोन दिवसांपासून पाथरी सोनपेठ रस्त्यावर बाभळगाव फाट्याच्या अलीकडे एका मोठ्या खड्ड्यात फसला आहे. अशातच फसलेल्या ट्रकच्या बाजूने ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना धोक्याची कसरत करावी लागत आहे.

पाठीमागील शनिवार रविवार दोन दिवस संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे स्पष्ट दुर्लक्ष केले आहे. शनिवार-रविवार दिवसभर वाहन जागीच उभी असल्याचे पाहायला मिळाले. रस्त्याची बिकट बोल की अवस्था पाहून सुद्धा न दिसल्यासारखे करणारे प्रतिनिधी याकडे आता लक्ष देणार का असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे. पाथरी सोनपेठ रस्त्यावरून बीड जिल्हा परभणी जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्याची पूर्वीचीच असलेली दुरवस्था त्यात आणखीन पडत असलेल्या पावसाने रस्त्याला बकाल स्वरूप आले आहे. शासकीय धान्य वितरण करणाऱ्या यंत्रणेला याचा चांगलाच अनुभव आला आहे. आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का योग्य ती दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कधी होईल हाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.