जव्हारमध्ये आदिवासी पाडयावर 7 किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्णसेवा

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना कालावधीतही जव्हारहून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर डोंगर दरीखोर्‍यात वसलेल्या दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी आणि भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे भौतिक सोयीसुविधांपासून दूर आहेत. त्यामुळे आजारी व्यक्तीला लाकडाच्या साह्याने डोली करून सहा ते सात किलोमीटर अंतर तुडवत झाप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

सुविधा नसल्याने 25 किलोमीटरचे अंतर पार करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात यावे लागत आहे. प्रवासी वाहन वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना उपचारांअभावी जीव गमवावा लागला आहे. या गावपाडयांत दळणवळणाची सोय नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याअभावी वृद्ध आणि गर्भवतींना रुग्णालयात नेताना ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाडयांची एकूण लोकसंख्या 1 हजार 400 इतकी आहे. भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे शिक्षण घेत असलेल्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत आहेत. मनमोहाडी या पाडयात 80 घरे असून त्यांना नदी ओलांडूनच रस्त्यावर यावे लागत आहे. मात्र, पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहू लागल्यानंतर या गावचा उर्वरित भागांशी असलेला संपर्क तुटतो. त्याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसत आहे.