दौंड : कोरोनाला हरवलं पण दिला जीव

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन –  तालुक्यातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने कोरोना संसर्गावरील उपचारानंतर रुग्णालयातून घरी आल्यावरती रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बोरीपार्धी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची कोरोना संसर्ग चाचणी केली असता, २४ जून रोजी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना पिंपरी येथील वाय. सी. एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदरील व्यक्तीस कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्यामुळे घरातील इतर सदस्यांची देखील चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या पत्नीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोना संसर्गावरती मात केल्यानंतर त्या व्यक्तीला बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. रात्री ते बोरीपार्धीतील आपल्या घरी आले आणि आज पहाटे त्यांनी बोरीपार्धी मधील रेल्वे गेटच्या पूर्व बाजूस रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यावर सुद्धा या व्यक्तीने आत्महत्या का केली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहे.

राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १,८०,२८९

गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ५५३७ कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १,८०,२८९ वर जाऊन पोहचली. तर राज्यात गेल्या २४ तासांत १८९ नवे मृत्यू नोंदवले गेले. राज्यात आतापर्यंत ८०५३ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. तर २४ तासांत २२४३ जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले. राज्याचा मृत्यू दर ४.४७ एवढा झाला आहे.