सिटीस्कॅनचं दुखणं सुरुच, रुग्णांचे प्रचंड नुकसान

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – पूर्वी शहरात असलेले डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे साधारणत: दोन वर्षांपूर्वी विष्णूपुरी येथे स्थलांतर झाले. त्यावेळी स्थलांतरापूर्वीच अनेक महिने यंत्र व इतर साहित्य खरेदीचा सपाटा सुरु करण्यात आला होता. प्रत्यक्षात महाविद्यालय आणि रुग्णालय इमारतींची अनेक कामेही त्यावेळी पूर्ण झाली नव्हती. अशावेळी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री मात्र येवून पडली होती. त्यामध्ये जवळपास २५ कोटी रुपयांच्या सिटीस्कॅन मशीनचाही सहभाग होता. शहरात रुग्णालय असताना या ठिकाणी अस्तित्वात असलेली जुनी सिटीस्कॅन मशीन सुरु असल्यामुळे नवीन मशीन कार्यान्वित करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक महिने ही मशीन धूळखात होती. त्यातच त्याच्या देखभाल अन् दुरुस्तीत बरेच महिने असेच वाया गेले.

महाविद्यालय आणि रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण झाल्यानंतर या ठिकाणी नवीन सिटीस्कॅन मशीन सुरु करण्यात आली. परंतु, त्यामध्ये वेळोवेळी तांत्रिक बिघाड येत होती. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या रकमेवरुन अनेकवेळा कंपनीचे अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासन यामध्ये समन्वय होत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून अनेक दिवस या विभागाला टाळेच लावावे लागत होते. आता पुन्हा एकदा गेल्या अडीच महिन्यांपासून याच कारणामुळे ही मशीन बंद आहे.

संबंधित विभाग मात्र दिवाळीनंतर मशीनची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगत आहे. परंतु, प्रत्यक्षात ती कधी सुरु होईल, याबाबत साशंकताच आहे. यामध्ये रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना हजारो रुपये मोजून बाहेरुन या तपासण्या कराव्या लागत आहेत.
याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर गोरगरिबांना सोयीस्कर होईल अशी चर्चा रुग्णालयात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या –
स्वाभीमानी शेतकरी संघटनेची सांगलीत जाळपोळ ; ऊस दर आंदोलन चिघळले
डहाणु जवळ मालगाडीच्या दोन डब्यांना आग 
दिवाळी पोलिसांची… कोणी वृद्धाश्रमात तर कोणी मुलाची सुटका झाल्यानंतर 
रानडुकराच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू