Bihar : राज्यात होणार मंत्रिमंडळ विस्तार; नावं निश्चित करण्यासाठी भाजप नेते दिल्लीला रवाना

पटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर संयुक्त जनता दलाचे (JDU) नितीशकुमार यांची मुख्यमंत्रिपदी पुन्हा निवड झाली. त्यांच्या सरकारला काही दिवस उलटल्यानंतर आता काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.

बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे. त्यानुसार काल (रविवार) रात्री उशिरा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद, राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी, माजी केंद्रीयमंत्री राधामोहनसिंग यांच्यासह अनेक नेतेमंडळी दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले.

भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल हे देखील अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. हे सर्व नेते आता दिल्लीत दाखल झाल्याने भाजपच्या या सर्व वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत संभाव्य नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावावरही चर्चा
दरम्यान, भाजप आज (सोमवार) दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या कोट्यातील मंत्र्यांची नावे निश्चित करेल. याशिवाय राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेच्या सदस्यांच्या (MLC) नावावर आजच निर्णय होण्याची शक्यता आहे.