भाजपाची मोठी घोषणा, सुशील कुमार मोदी असणार बिहारमधून राज्यसभा उमेदवार

पाटणा/ नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि लोजपा नेते राम विलास पासवान यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाने उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपाने बिहारचे माजी डेप्यूटी सीएम सुशील कुमार मोदी यांना राज्यसभा उमेदवार बनवले आहे. तसेच, राज्यसभेचे उमेदवार बनवल्यानंतर जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी सुशील कुमार मोदी यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. राज्यसभेच्या या एका जागेसाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे आणि यावर 14 डिसेंबरला पोटनिवडणूक होईल. रामविलास पासवान भाजपा आणि जेडीयूच्या सहकार्याने 2019 मध्ये बिनविरोध निवडूण आले होते. या जागेचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 पर्यंत आहे. बिहारच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य पासवान यांचे याच 8 ऑक्टोबरला निधन झाले होते.

यावेळी नितीश कुमार यांचे ’सरकारी साथी’ मानले जाणारे सुशील कुमार मोदी यांना बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र, ते डेप्युटी सीएम होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत होता. या दरम्यान नितीश कुमार यांनी मीडियाला स्पष्ट सांगितले होते की, सुशील मोदी यांना डेप्युटी सीएम न बनवण्याचा निर्णय भाजपाचा आहे आणि त्यांनाच प्रश्न विचारा. तर भाजपा नेत्यांनी म्हटले होते की, आम्ही सर्व पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि हे आमचे भाग्य आहे. चर्चा अशी सुद्धा होती की, भाजपा बिहारच्या या दिग्गज नेत्याला राज्यसभेत घेऊन जाऊ शकते आणि यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

असा आहे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
या एका जागेच्या निवडणुकीसाठी 14 डिसेंबरला मतदान करण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. यापूर्वी 3 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 4 डिसेंबरला स्क्रूटनीची तारीख आहे. उमेदवार सात डिसेंबरपर्यंत आपली उमेदवारी मागे घेऊ शकतात. 14 डिसेंबरला मतदान होईल. सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

You might also like