CoronaVirus : बिहार सरकारचा मोठा ‘निर्णय’, शाळा-महाविद्यालये, सिनेमा हॉल 31 मार्चपर्यंत ‘बंद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज त्यांच्या निवासस्थानी कोरोना विषाणूसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर मुख्य सचिव दीपक कुमार यांनी एक मोठी घोषणा केली ज्यात ते म्हणाले की कोरोना विषाणूसंदर्भात खबरदारी म्हणून बिहार सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था, सर्व सिनेमा हॉल, प्राणिसंग्रहालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु सीबीएसई च्या परीक्षा सुरूच ठेवल्या जातील. तसेच सरकारी कर्मचारी देखील अल्टरनेट पद्धतीनं कार्यालयात येतील, जेणेकरून सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी होणार नाही.

बिहार दिन साजरा होणार नाही
तसेच मुख्य सचिव दीपक कुमार म्हणाले की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च रोजी होणार बिहार दिवस रद्द करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमासंदर्भात नवीन तारखेची घोषणा पुढील काळात करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच इतर कोणतेही सामूहिक कार्यक्रम देखील आयोजित केले जाणार नाहीत. तसेच ते पुढे म्हणाले की बिहारमधील सर्व अंगणवाडी केंद्रे बंदच ठेवण्यात येतील. शाळा बंद असल्यामुळे मिड-डे मिलची रक्कम मुलांच्या कुटुंबियांच्या खात्यावर टाकली जाईल. सोमवारी कोरोनासंदर्भात बिहारमध्ये पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोणत्याही सरकारी कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही
तसेच राज्यात कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही. त्याचबरोबर आरोग्य विभागातील सर्व कर्मचार्‍यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पटनाच्या पीएमसीएचच्या सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच संग्रहालये देखील बंद ठेवण्यात आले असून जनतेला मार्गदर्शक सूचनाही देण्यात येणार आहेत.

नॉन-व्हेज वर बंदी नाही
मुख्य सचिवांनी सांगितले की खबरदारी म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत, तसेच नॉन-व्हेजवरील बंदीसंदर्भात सरकारकडून कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. ३१ मार्चपर्यंत हा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर बिहार इंडस्ट्रीज असोसिएशनने पटना येथे १४ मार्च रोजी होणाऱ्या ‘बिहार स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’ चा कार्यक्रम रद्द केला आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडे आणि अनेक उच्च अधिकारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमधील कोरोना संरक्षणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती घेतली. तसेच यासंदर्भात कोणती पावले उचलावीत, यावरही चर्चा केली.

दरम्यान बिहारमध्ये आतापर्यंत ६० पेक्षा अधिक संशयितांची चाचणी करण्यात आली आहे. परंतु कोणत्याही रूग्णात कोरोनाची सकारात्मक लक्षणे दिसली नाहीत. त्याचबरोबर बिहारच्या सीमावर्ती भागात तसेच बोधगयामध्ये खास नजर ठेवण्यात येत आहे, कारण तेथे परदेशी पर्यटक जास्त प्रमाणात आहेत.

बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे म्हणाले की, उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून आम्ही सतत परिस्थितीचा आढावा घेत असतो आणि अधिकऱ्यांनीही निर्देशित केले जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि विमानतळावर विशेष दक्षता ठेवली जात आहे. तसेच ते म्हणाले की लोकांनी यापासून जास्त भीती न बाळगता खबरदारी घेणे गरजेचे आहे.