CM नीतीश कुमार यांच्या हत्येची धमकी, मारणार्‍याला 25 लाखाच्या बक्षीसाची घोषणा, पंजाबशी संबंधित प्रकरण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एका माथेफिरूने जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर मारणाऱ्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे दिलेली ही धमकी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संपूर्ण प्रकरण बिहारच्या रोहतास (सासाराम) जिल्ह्यातील असल्याचे समजते. प्राथमिक तपासणीत हे प्रकरण पंजाबमधील असल्याचे सांगितले जात असून पंजाब पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दुसरीकडे, फेसबुक पोस्टबद्दल मुख्यमंत्री समर्थकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. प्रशासकीय कार्यालयातही प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सासाराममधील दिनारा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात एका तरूणाने फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. याप्रकरणी पोलिस स्टेशनचे अध्यक्ष सियाराम सिंह यांच्या निवेदनावर संबंधित आरोपीवर एफआयआर दाखल केली. धर्मेद्रकुमार पांडे असे या माथेफिरू युवकाचे नाव असून तो तोडा गावचा रहिवासी असल्याचे समजते.

दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलिस स्टेशन अधिकारी सियाराम सिंह यांनी सांगितले आहे की, धर्मेंद्र याने मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्यास 25 लाख रुपयांचे बक्षीस असे लिहीत फेसबुकवर पोस्ट केले होते. या संदर्भात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करणार्‍या धर्मेंद्रला पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात रोहतासचे एसपी सत्यवीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार आरोपी धर्मेंद्र मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस याप्रकरणी तपास करून कारवाई करतील.

You might also like