लालू यादव सलग 11 व्यांदा बनले ‘अध्यक्ष’, तुरूंगातून सांभाळणार पक्षाची ‘सुत्रे’

पटना : वृत्तसंस्था – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. ते सलग अकराव्यांदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. आरजेडीच्या संघटना निवडणुकीत मंगळवारी दुपारी लालू यादव यांच्या अनुपस्थित आमदार भोला यादव यांनी प्रतिनिधी म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अध्यक्षपदासाठी लालू यादव यांचे एकमेव नामांकन आल्याने त्यांना पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तेजस्वी यादव यांच्या नावाचीही चर्चा –
लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत होते परंतु लालूंच्या एकमेव उमेदवारीमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. लालू यादव यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पक्षाच्या स्थापनेनंतर ही पहिलीच वेळ आहे. पटना येथील बिरचंद पटेल पथ स्थित आरजेडी कार्यालयात झालेल्या उमेदवारी कार्यक्रमात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.

10 डिसेंबरला होणार शिक्कामोर्तब –
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीत सुमारे 600 राष्ट्रीय परिषद सदस्य भाग घेतात. हे सर्व सदस्य 10 डिसेंबर रोजी लालू यादव यांच्या नावावर राजद प्रमुख शिक्कामोर्तब करतील. लालू सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी रांचीच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहेत.

Visit : policenama.com