कोरोनावरील लस घेतल्यानंतरही एकाचा मृत्यू; संपर्कातील इतरही कोरोनाबाधित

पटना : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनावरील लसीकरण सुरु झाले आहे. या लसीकरणाचा देशात दुसरा टप्पा सुरु आहे. त्यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लोक जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, अशा लोकांना लस दिली जात आहे. पण आता याच लसीकरणावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पटना येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने कोरोना लस घेतली होती. मात्र, तरीही त्याचा मृत्यू झाला आहे.

शुभेंदू शेखर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुभेंदू हा नालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. यातील विशेष बाब म्हणजे शुभेंदू याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनावरील लस घेतली होती. मात्र, 1 मार्चला त्याचा मृत्यू झाला. तसेच शुभेंदू याच्या संपर्कात आलेले 8 ते 10 विद्यार्थीही कोरोनाबाधित आढळले आहेत.

शुभेंद्र शेखर हा 23 वर्षीय मुलगा बेगूसराय जिल्ह्यातील दहिया गावातील रहिवासी होता. तो एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. त्याला 24 फेब्रुवारीला अचानक सर्दी आणि खोकला झाला. त्यानंतर त्याची RT-PCR टेस्ट करण्यात आली होती. टेस्ट केल्यानंतर तो गावी गेला. रविवारी शुभेंधूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर एक मार्चला त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेवरून दु:ख व्यक्त केले. तसेच त्याच्या संपर्कातील इतर काही विद्यार्थीही कोरोनाबाधित आढळले आहेत.