नितीश सरकारचा मोठा निर्णय ! रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्यास रद्द होणार वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन्स देखील होणार कॅन्सल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    बिहारमध्ये रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नितीश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रस्ते अपघातासाठी दोषी वाहनांची नोंदणी आता रद्द केली जाणार आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केला जाईल. परिवहन सचिव संजय अग्रवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. याबरोबरच ऑटो व बसमध्ये ओव्हरलोडिंग बाबतही सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. जिल्ह्यात हेल्मेट, सीटबेल्टसह फिटनेस तपासणी मोहीम वेगवान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर , बिहारच्या शाळांमध्ये मैथिली भाषेच्या अभ्यासाबाबत बिहार सरकार लवकरच एक सकारात्मक निर्णय घेऊ शकते. बिहार विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार उत्तर देण्यासाठी सभागृहात पोहोचले असता कॉंग्रेसचे एमएलसी प्रेमचंद्र मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली मागणी केली. प्रेमचंद मिश्रा म्हणाले की, शालेय अभ्यासक्रमात पुन्हा मैथिलीचा समावेश करण्यात यावा, अशी बर्‍याच काळापासून लोकांची मागणी आहे. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा अनेक वेळा सभागृहातही उपस्थित केला आहे. कॉंग्रेस एमएलसीच्या या मागणीवर मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, मैथिली त्यांचीही आवडती भाषा आहे. शिक्षण विभागाने निर्णय घेतल्यास ते मुख्यमंत्री म्हणून त्याचे स्वागत करतील.

लक्झरी इलेक्ट्रिक बस चालवण्याची तयारी

लवकरच बिहारच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक बस धावणार आहे. पटनावासीयांना लक्झरी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करुन देण्याची तयारी पूर्ण झाली असून यासाठी आठ बसेस पाटण्यातील फुलवारीशरीफवर पोहोचल्या आहेत. या आधुनिक इलेक्ट्रिक बस एका तासात रीचार्ज होतील आणि संपूर्ण रिचार्जनंतर ते 250 किलोमीटरचा प्रवास करतील. सध्या राजधानी पाटणा येथून राजगीरमार्गे बिहारशरीफ आणि पाटणा ते हाजीपूर ते मुजफ्फरपूर अशी इलेक्ट्रिक बस चालविण्यात येणार आहेत. हे यशस्वी झाल्यास उर्वरित जिल्हेही इलेक्ट्रिक बस प्रकल्पाशी जोडले जातील. या बसेसचे भाडे सामान्य बसपेक्षा कमी असेल.