Birthday Special : क्रिकेटमध्ये फ्लॉप, पॉलिटिक्समध्ये सुपर हिट, अशी आहे वयाच्या 26 व्या वर्षी डेप्युटी सीएम बनलेल्या ‘तेजस्वीं’ची स्टोरी

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव आहे तेजस्वी यादव. क्रिकेटर ते बिहारचे उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास करणारा हा तरुण राजकीय नेता आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. लालू यादव यांच्या अनुपस्थितीत बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव मुख्यमंत्री (cm) होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

तेजस्वी यादव यांनी अगोदर कधी विचारही केला नव्हता की, ते राजकारणात येतील आणि इतक्या लवकर नाव प्रस्थापित करतील. परंतु, कालचक्र असे काही फिरले की, क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार मारणारे तेजस्वी यांना बॅट आणि बॉलशी फारकत घ्यावी लागली आणि राजकारणाच्या खेळपट्टीवर नवा डाव खेळण्यासाठी तयार व्हावे लागले. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामनासुद्धा करावा लागला. स्थिती अशीही झाली की त्यांचा नवा डाव रंगण्याअगोदरच संपणार आहे, असे वाटत होते. परंतु, यावेळी निवडणुकीच्या रणधुमाळीत तेजस्वी विरोधकांपेक्षा सरस ठरले.

20 व्या वर्षी क्रिकेटर, 26 मध्ये उपमुख्यमंत्री
तेजस्वी जेव्हा 20 वर्षांचे होते तेव्हा 2009 मध्ये त्यांनी आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली. याच वर्षी तेजस्वी झारखंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेट टीममध्ये सहभागी झाले. त्यांनी क्रिकेटप्रमाणे आपला लुकसुद्धा बदलला होता. क्रिकेट खेळणे सुरू केले, परंतु चांगला खेळ ते करू शकले नाहीत. तेजस्वी यांनी रजणीसह आयपीएल (IPL) कडेसुद्धा मोर्चा वळवला होता. ते आयपीएलच्या अनेक सीझन्समध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा भाग होते; परंतु त्यांना एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तेजस्वी टीममध्ये ऑलराउंडर म्हणून होते आणि फलंदाजीसह स्पिन गोलंदाजीसुद्धा करत होते.

मुलींमध्ये आहे खास क्रेझ
लालू यादव यांच्या दोन मुलांमध्ये तेजस्वी हे छोटे आहेत, परंतु मीडियापासून सोशल मीडियापर्यंत लाइम लाइटमध्ये ते आपला मोठा भाऊ तेजप्रताप यादवच्या खूप पुढे आहेत. तेजस्वीने बिहारची सूत्रे सांभाळण्यापूर्वी सोशल मीडियावर आपली सक्रियता दाखवली आणि इलेक्शनसाठी वॉर रूम बनवली. तेजस्वी यांची क्रेझ मुलींमध्ये किती आहे, याचे उदाहरण त्यावेळी पाहायला मिळाले जेवहा ते उपमुख्यमंत्री पदासह बिहार रस्ते विकासमंत्री बनले. त्यांच्या विभागाच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रारी आणि सूचनांपेक्षा विवाहाची प्रपोजल (purposal) जास्त येत होती. तेव्हा तेजस्वी यांना सुमारे 40 हजारांपेक्षा मुलींनी लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र, लग्नाच्या बाबतीत तेजस्वी यांनी अजूनपर्यंत हेच म्हटले की, हा निर्णय कुटुंबीयांचा आहे, जो योग्यवेळी ते घेतील.

भविष्याचा चेहरा
तेजस्वी यादव यांचा राजकीय प्रवास 7 वर्षांपूर्वी म्हणजे 2010मध्ये सुरू झाला, परंतु आता ते आपला पक्ष राजद (RJd)चा चेहरा बनले आहेत. जर एग्झिट पोलप्रमाणे बिहारचे निकाल आले तर ते सर्वांत तरुण सीएमसुद्धा होऊ शकतात. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची खरी ओळख निर्माण झाली. 2010 मध्ये त्यांचे वडील लालू यादव यांनी आपल्यासोबत त्यांना घेतले होते आणि लोकांना त्यांची ओळख करून देत होते. परंतु, 2015 च्या निवडणुकीत तेजस्वी पक्षाचे स्टार बनले. वैशाली जिल्ह्यातून ते प्रथम आमदार म्हणून निवडून आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले.

मोठ्या भावाची मिळते साथ
तेजस्वी हे वयाने आपला भाऊ तेजप्रताप यांच्यापेक्षा लहान असले तरी अनेक लोकांना तेच मोठे असल्याचे वाटते. घोटाळ्यांचा आरोप झाल्यानंतरसुद्धा तेजस्वी यांना तेजप्रताप यांची साथ मिळत होती. दोघे भाऊ सभागृहातही एकत्रच दिसत असत. सोशल मीडियावरसुद्धा दोघे सक्रिय दिसतात.