‘या’ पक्षाचा अजब जाहीरनामा ; ताडीला देणार कायदेशीर मान्यता तर ७ वी पास बनणार पोलीस

पाटणा : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यानंतर आता विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. या जाहीरनाम्यांमध्ये मतदारांना खुश ठेवण्यासाठी विविध आश्वासने तसेच घोषणा जाहीर करण्याची चढाओढ लागली आहे. राष्ट्रीय जनता दला(राजद)नेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये सत्तेत आल्यास ताडीला कायदेशीर मान्यता देणार, जातीय आधारावर जनगणना करणार, तसेच पोलिस भरतीसाठी ७ वी आणि ८ वी ही शिक्षणाची अट ठेवणार यांसारखी आश्वासने देण्यात आली आहेत.

पाटणा येथील पक्ष कार्यालयात तेजस्वी यादवसह राजदच्या नेत्यांनी पक्षाच्या जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळी जाहीरनाम्याविषयी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की , सामाजिक न्यायाच्या दिशेनं आम्ही जात आहोत. लालूप्रसाद यादव यांनीही गरिबांच्या उद्धारासाठी भरीव कार्य केलं आहे.’

राजदच्या जाहीरनाम्यातील आश्वासने –

राजदनं सत्तेत आल्यास ताडीला कायदेशीर मान्यता देणार तसेच ताडी विकणं आणि पिण्याची सुविधा मोफत होणार आहे.

जातीय आधारावर जनगणना करणार. २०२१ पर्यंत सर्व जातीच्या लोकांची जनगणना केली जाईल. तसेच केंद्रातील सत्तेत सहभागी झाल्यास लोकांना आपल्याच राज्यात नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून जनतेला नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही.

सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीतील आरक्षण कायम राहणार आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास आरक्षणाच्या टक्काही वाढायला हवा. राजदनं स्वतःच्या जाहीरनाम्यात मंड आयोगाच्या शिफारशी पुन्हा लागू करणार असल्याचं म्हटलं आहे.

सरकारमधील रिक्त पदे तात्काळ भरणार आहे. जाहीरनाम्यात ताडीला कायदेशीर मान्यता देणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलिसांच्या भरतीसाठी ७ वी आणि ८ वी ही शिक्षणाची अट ठेवणार.

प्रवासी बिहारी नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात येणार आहे.