5 वी च्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा

पोलीसनामा ऑनलाईनः तीन वर्षापूर्वी आपल्याच शाळेतील पाचवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक अरविंद कुमार याला पाटनाच्या सिव्हील कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तर यासाठी त्यांना मदत करणाऱ्या अभिषेक कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर अरविंद कुमार याला 1 लाख रुपये तर अभिषेक कुमार याला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही आरोपींना मंगळवारी (दि. 16) दोषी ठरवण्यात आले आहे.

बिहारच्या पाटणा शहरातील फुलवारी शरीफ परिसरातील न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक अरविंद कुमार याने सप्टेंबर 2018 मध्ये आपल्याच शाळेतील 5 वीच्या विद्यार्थिनीवर त्यांच्या केबिनमध्ये बलात्कार केला होता. यासाठी शाळेतील लिपिक अभिषेक कुमार याने त्याला साथ दिली होती. मात्र घाबरलेल्या मुलीने याबाबत घरी कोणालाही सांगितले नाही. पीडितेच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिला घरच्यांनी दवाखान्यात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. आपली एवढी लहान मुलगी गर्भवती असल्याचे ऐकताच घरच्यांना मानसिक धक्काच बसला होता. मुलीला विचारले असता शाळेच्या मुख्याध्यापक आणि लिपिकाचे तिने नाव सांगितले.

संतापलेल्या कुटुंबाने दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. तक्रारीची तत्काळ दखल घेत मुख्याध्यापक अरविंद कुमार आणि लिपिक अभिषेक कुमार या दोघांना अटक केली होती. या प्रकरणात सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे पीएमसीएचमध्ये पीडितेचा गर्भपात केला होता. गर्भपाताचे अंश, पीडिता आणि अरविंद कुमार यांचे डीएनए चाचणीचे रिपोर्ट एकमेकांशी जुळले आहेत. कोर्टाने ही रेअरेस्ट रेअर केस असल्याचे सांगत दोन्ही आरोपींना दोषी ठरवले आहे.