काय सांगता ! होय, पास करा नाहीतर माझं लग्न मोडेल, विद्यार्थ्यानं चक्क उत्तरपत्रिकेतून केली विचित्र विनंती

पाटणाः पोलीसनामा ऑनलाईनः काही दिवसातच माझं लग्न होणार आहे आणि परीक्षा पास झालो नाही तर लग्न तुटेल अशी विनवणी करणारे मेसेज एका परीक्षार्थी विद्यार्थ्याने चक्क उत्तर पत्रिकेत लिहल्याचे समोर आले आहे. बिहारमधील पाटलीपुत्र विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्यांने अशी अजबगजब विनंती केली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणा-यालाही प्रश्न पडला आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे मार्चपासून बिहारमधील सर्व कॉलेजेस बंद होती. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु होते. सध्या विद्यापीठात प्रथम वर्षाच्या पेपरची तपासणी सुरु आहे. जेडी वुमेन्स कॉलेजमध्ये उत्तरपत्रिकांची तपासणी केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने अभ्यास झालेला नाही म्हणून पास करा अशी विनंती केली आहे. यावेळी एका उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्याने केलेली विनंती शिक्षकांना धक्का देणारी अशीच आहे. त्याने म्हटले आहे की, काही दिवसातच माझे लग्न होणार आहे आणि परीक्षा पास झालो नाही तर लग्न तुटेल अशी विनवणी केली आहे. याबाबत पाटलीपुत्र विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर प्रवीण कुमार म्हणाले की, सर्व कॉलेजमध्ये ऑनलाइन क्लासेस घेऊनच अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यानंतर कोणाकडूनही लॉकडाऊन किंवा कोरोनाची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. परीक्षक त्यांचे काम योग्य पद्धतीने करत आहेत. तपासणीचे काम शेवटच्या टप्प्यात असून येत्या दोन आठवड्यात सर्व निकाल लावण्यात येतील.