खुशखबर ! आता पेट्रोल ‘पाउच’मध्येही मिळणार, अंमलबजावणी झाल्यास ‘सुपर’ मार्केटमध्ये विक्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आता लवकरच तुम्हाला पाउचमध्ये पेट्रोल मिळू शकणार आहे. होय, शासनाच्या विचाराधीन असणाऱ्या नवीन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास असे होऊ शकणार आहे. या योजनेनुसार अनेक परदेशी कंपन्या भारताच्या किरकोळ क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. यामध्ये सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल कंपनी ‘सौदी अरामको’ चा समावेश आहे. या व्यतिरिक्त ‘टोटल’ आणि ‘ट्रॅफिगुरा’ सारख्या बड्या परदेशी कंपन्यांचादेखील सुपरमार्केट उघडण्याच्या यादीत समावेश आहे. खास गोष्ट म्हणजे या कंपन्या आपल्या सुपर मार्केटमध्ये पेट्रोलची विक्री देखील करू शकतील. आता जर हे घडले तर तिथे पाउचमध्ये पेट्रोल विकले जाईल.

काय आहे योजना
सूत्रांच्या माहितीनुसार तेल मंत्रालयाने २० वर्षांपूर्वीचा एक नियम रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या नियमाद्वारे देशात पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनांच्या विपणनासाठी केवळ त्याच कंपन्यांना परवानगी दिली जाते ज्यांनी तेलाच्या अन्वेषण, उत्पादन, शुद्धीकरण, पाइपलाइन साठी देशात २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे किंवा एवढी रक्कम गुंतविण्याचा प्रस्ताव आहे. तेल मंत्रालय या प्रस्तावावर अर्थ, वाणिज्य आणि कायदा मंत्रालयांचा सल्ला घेत आहे. त्या समितीने हे क्षेत्रदेखील बिगर तेल कंपन्यांसाठी सुरू करावे, पेट्रोल पंप बसविण्याचे वेळापत्रक तयार करावे व त्याचे पालन न करणाऱ्यांना दंड करावा अशा सूचना केल्या होत्या. कमीतकमी गुंतवणूकीचा नियम हा भारतातील वेगाने वाढणार्‍या इंधन बाजारामध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असलेल्या परदेशी कंपन्यांसाठी मोठी अडचण ठरली आहे.

सौदी अरेबियाची ‘सौदी अरामको’, फ्रान्सची ‘टोटल’ आणि तेल व्यापार कंपनी ट्रॅफिगुरा यांना परवाना नियमात बदल झाल्यास फायदा होऊ शकेल. सौदी अरामको यांनी तेल मंत्रालयाला अलीकडेच तेलाच्या किरकोळ व्यवसायात भारतात प्रवेश करू इच्छित असल्याचे पत्र लिहिले होते.

आरोग्यविषयक वृत्त