पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या जवळील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ रस्त्यावरून येण्या-जाण्याच्या कारणावरून थेट बंदुकीतून गोळ्या झाडून एकाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

अजय रागू साठे (वय 40) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साठे व आरोपी यांचे शेतीच्या रस्त्यावरून वाद आहेत. दोघेही मुळशी तालुक्यातील माळीन गावचे आहेत. त्यांची या परिसरात शेती आहे.

यापूर्वी देखील त्यांच्यात वाद झाले होते. दरम्यान आरोपींकडे छऱ्यांची मोठी बंदूक आहे. आज देखील काही वेळापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. साठे याने त्यांना रस्त्यावरून जाऊ नये असे म्हंटल्यानंतर आरोपी थेट घरी गेला आणि त्याने बंदूक आणली. तसेच गोळ्या झाडल्या. यात साठे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पसार झाला आहे. दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळी पौड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. शेती शेजारी शेजारी असून, त्यांचे पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद होते. त्यातून हा प्रकार घडला आहे.