‘हॅरी पॉटर’ आणि ‘चर्नोबिल’ फेम ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर यांचं 54 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्रिटीश नाटकांसोबतच अनेक चित्रपटही गाजवलेले बहुगुणी ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर (वय 54) यांचे मंगळवारी (दि. 6) निधन झाले. ते गेल्या काही वर्षापासून ब्रेन ट्युमर या आजाराशी झुंज देत होते. अशी माहिती मिळत आहे की पॉल यांनी आपली पत्नी पॉली, मुले फ्रँक आणि नोआ हे जवळ असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पॉल रिटर ब्रिटीश दूरचित्रवाणीचा सुप्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी फ्रायडे नाईट डिनर या मालिकेतही काम केले होते. चर्नोबिल या वेबसीरीजमध्ये त्यांनी अणु ऊर्जा प्रकल्पावरच्या एका इंजिनीयरची भूमिका साकारली होती. हॅरी पॉटर एँड हाफ ब्लड प्रिन्स या चित्रपटात पॉल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच ब्रिटीश रंगभूमीवरचं त्यांचे काम उल्लेखनीय होते. द ऑडियन्स’ या नाटकात त्यांनी जॉन मेयर ही पंतप्रधानाची भूमिका साकारली होती. ऑल माय सन्स, द कोस्ट ऑफ युटोपिया, कोरम बॉय, द क्युरीयस इन्सिडंट ऑफ द डॉग इन द नाईट टाईम ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. 2009 साली त्यांना द नॉर्मन कॉन्क्वेस्ट यातील त्यांच्या कामासाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.