पद्मसिंह पाटलांच्या अडचणीत वाढ ?, पवनराजे निंबाळकर खून प्रकरणाला ‘नाट्यमय’ वळण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडातील आरोपी पारसमल जैन याने मुंबई उच्च न्यायालयात माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सुनावणी अंतिम टप्प्यात असताना आरोपीने अशा प्रकारे माफीचा साक्षिदार होण्यासाठी केलेल्या अर्जामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाला आता एखादे नवीन वळण लागणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आरोपी पारसमल याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केल्याने या खून प्रकरणात नवा खुलासा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील हे आरोपी आहेत. त्यामुळे आता पारसमल जैन याच्या अर्जामुळे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता या खटल्याबाबत पुढे काय होणार याबाबतच्या सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

काय आहे नेमकं पवनराजे खून प्रकरण
पवनराजे यांची अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पवनराजे आणि पदमसिंह पाटील हे दोन चुलत बंधू सुरवातीला एकत्र राजकारण करत होते. मात्र नंतरच्या काळात या दोघांमध्ये मतभेद झाले परिणामी दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यानंतर अवघ्या उस्मानाबादच्या दोघांमधील राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणावर पाहिला आणि अशातच पवनराजे यांचा खून झाला होता.

3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथून जात असताना दोन व्यक्तींकडून पवनराजे यांचा पाठलाग करून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये पवनराजेंसह त्यांच्या वाहन चालकाचा देखील मृत्यू झाला होता. 2009 मध्ये पदमसिंह पाटील यांना सीबीआयने अटक देखील केली होती. नंतर पाटील यांना याबाबत जामिन देखील मंजूर करण्यात आला होता.

पुढील पिढीतही सुरु आहे मोठा संघर्ष
पाटील – पवनराजे यांच्या संघर्षानंतर त्यांच्या दुसऱ्या पिढीत देखील हा संघर्ष सुरु आहे. पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे आणि डॉ. पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह यांच्यात राजकीय संघर्ष सध्या खूप मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे दोघेही एक मेकांविरुद्ध लढले होते. यामध्ये ओमराजे विजयी झाले होते.

Visit : Policenama.com