निर्भया प्रकरण : तिहार जेलमध्ये पोहचला पवन जल्लाद, फाशीची अंतिम ट्रायल घेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणामधील दोषींना फाशी देण्याची तयारी सुरु झाली आहे. याच दरम्यान चार दोषींना फाशी देणारा पवन जल्लाद आज (गुरुवार) तिहार जेलमध्ये पोहचला आहे. पवन जल्लादला जेल नंबर 3 आणि फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारा दोर दाखवण्यात येणार आहे. डमी फाशी देण्याचा सराव पवन जल्लाद करणार आहे जेणेकरून फाशी देण्याच्या वेळेला तो मानसिक दृष्ट्या तयार होईल.

निर्भया प्रकरणातील दोषी आरोपींचे डेथ वॉरंट वर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर पवन जल्लाद चार आरोपींना फाशी देणार असल्याचे निश्चित झाले. या पार्श्वभूमिवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवन जल्लादने सांगितले की, दोन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंत करतो. दोषींना फाशी देऊन मला पंतप्रधान मोदींच्या मोहिमेत सहभागी होता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची माझी इच्छा आहे.

पवन जल्लादने सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ हे अभियान सुरु केले आहे. या अभियानातून मुलींना मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. आता मुलींच्या बाबतीत कोठेही काहीही झाले तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते. लोकांना आता समजू लागले आहे की मुलींना वाचवले तर आपला समाज सुरक्षित राहिल. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याबाबत पवन याने सांगितले की, एका मुलीसोबत वाईट झाले. वाईट काम करणाऱ्यांना फाशी दिल्याने मला पंतप्रधान मोदी यांच्या बेटी बचाओ-बेटी पढाओ या मोहिमेत एक पाऊल चालण्याची संधी मिळाली.