‘मोदींचा अर्थ’ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय – काँग्रेस प्रवक्त्याची जीभ घसरली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून बऱ्याचदा आरोप-प्रत्यारोप सुरु असताना पुन्हा एकदा मोदींवर काँग्रेसकडून आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदींचा (MODI) अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. भाजपने यावर आक्षेप घेत आपल्या अधिकृत ट्विटरवर या विधानाचा मुद्दा उचलत ट्वीट केले आहे. पवन खेडा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट केला आहे. पवन खेडा यांच्या वादग्रस्त विधानावर नेटीझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस प्रवृक्ता पवन खेडा यांनी मोदी यांचा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा सांगितला आहे. आपल्याजवळ काँग्रेस असताना पाकिस्तानसारख्या दुश्मनाची गरज काय आहे? असं भाजपानं म्हटलं आहे.

या चर्चेत भाजपाकडून पक्षाचे प्रवृक्ते संबित पात्रा सामील झाले होते. त्यांनी पवन खेडा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत हे आपत्तीजनक वक्तव्य आहे असं म्हंटल आहे. देशाच्या पंतप्रधानांची तुलना तुम्ही ओसामा बिन लादेनसोबत कशी करू शकता? असा प्रश्न उपस्थित करत पवन खेडा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. पवन खेडा यांचे हे वादग्रस्त विधान काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यासारखे दिसतात –

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक हुकूमशहासारखे काम करीत असून त्यांच्या कार्यकाळात लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. तसेच मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात’, कधी ते आपल्यावर कोणता बॉम्ब टाकतील याची सतत भीती वाटते. त्यामुळे मोदींना सगळेच लोक घाबरतात. जनतेवर प्रेम करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला घाबरवत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या माणसाने कसं नसावं याचं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत,असे वादग्रस्त विधान काँग्रेसच्या नेत्या विजयशांती यांनी केले होते. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले होते.