बारामतीत यंदा एकत्रित दिवाळी साजरी न करण्याचा पवार कुटुंबाचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत (NCP chief Sharad Pawar) दरवर्षी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन बारामतीमध्ये परंपरेनुसार दिवाळीचा सण (celebrate diwali) साजरा करतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दशकाची सामूहिक दिवाळीची परंपरा यंदा पवार कुटुंबीयांना खंडित (pawar-family-decided-not-to-celebrate-this-year-diwali-at-baramati) करावी लागली आहे. दिवाळी पाडव्याला हितचिंतकांच्या होणा-या स्नेहभेटी, शुभेच्छांचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे यंदा कार्यकर्त्यांना शरद पवार यांना भेटता येणार नाही.

काेरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधू-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरूनच शुभेच्छा द्याव्यात. आपल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षाची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करूया, असे विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबीयांच्या वतीने राज्यातील जनतेला व हितचिंतकांना करण्यात आले आहे. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्या वतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून, बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामूहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपरिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दिवाळी पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बंधू-भगिनी बारामतीत येऊन पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असतो. परंतु, कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जिवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामूहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडित करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचे दु:ख निश्चितच आहे. यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, काेरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून सुरक्षितपणे साजरी करूया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करीत समस्त पवार कुटुंबीयांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.