Solapur News : शरद पवारांना राष्ट्रीय प्रश्नासाठी वेळ मिळतो पण मराठा आरक्षणासाठी नाही, ‘शिवसंग्राम’च्या मेटेंची टीका

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार देशाचे नेते असून, शेतकरी आंदोलनासारखे प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यासाठी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. मात्र, मराठा आरक्षणासारख्या विषयावर राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा टोला शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी लगावला. तसेच श्रेयवादासाठी ठाकरे सरकार मराठा आरक्षणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही मेटे यांनी सोलापुरात केला.

वार्ताहरांना बोलताना मेटे म्हणाले, मराठा आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असताना, याबाबत एकमेकांकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात आरक्षण मिळाले असताना ते आरक्षण चुकीचे असल्याची चर्चा काही सत्ताधारी नेते करत आहेत. मग तेव्हा त्यांनी दुरुस्ती का सुचवली नाही, असा सवाल त्यांनी विचारला.

देवेंद्र फडणीवस यांनी आरक्षण दिल्यावर राष्ट्रवादी, काँग्रेसला त्याचा आनंदही झाला नव्हता. मात्र, आता आरक्षण अबाधित राखण्याऐवजी सरकारमधील दोन पक्षांचे नेते मराठा आरक्षण विरुद्ध भूमिका घेतात. मराठा समाजाच्या कल्याणापेक्षा ओबीसींच्या मतावर डोळा ठेवून विजय वड्डेटीवार व छगन भुजबळ भूमिका वटवट असतात, असे टीकास्त्र मेटे यांनी यावेळी सोडले.