अनिल बोंडे यांचं शरद पवारांना पत्र; म्हणाले – ‘पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी एक पत्र लिहले आहे. ते पत्र त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लिहले आहे. बोंडे यांचे पत्र आता समाज माध्यमावर प्रसारित होत आहे. पवार साहेब मुख्यमंत्री फक्त तुमचेच ऐकतात. दारूवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारूवाले तुम्हाला त्यांचे आशीर्वाद देतीलच, परंतु, दारूवाल्यांच्या आशिर्वादांवरच तुमची मदार असेल, मात्र, राज्यातील १५० लाख शेतकरी कुटुंब सर्व अडचणीत आहे. शेतमजूर देखील सरकारकडे आशेने बघत आहे. १२ बालुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. यासगळ्या शेतकरी, शेतमजूर आणि १२ बलुतेदारांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा, असे त्या पत्रात उल्लेख केला आहे.

पत्रातून काय म्हणाले अनिल बोंडे?

मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि बार मालकांना करसवलत देण्याची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती. यावरूनच अनिल बोंडे यांनी पवार यांना पत्र लिहले आहे. बोंडे म्हणाले, गावखेड्यातील शेतमजूर, वाजंत्रीवाले, नाभिकांसह सर्व १२ बलुतेदार आज आर्थिक संकटात आहेत. स्वतःचं कुटुंब पोसण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. मायबाप सरकार पुन्हा लॉकडाऊन वाढवणार आहे. अशा वेळी या सर्वांना मदतीची आवश्यकता आहे. करोनाच्या संकटात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदींनी ६००० रुपये दिले. महाराष्ट्रातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशा ९४ लाख शेतकऱ्यांना त्यामुळे आधार मिळाला.

मागील काही महिन्यांमध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकदा अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्याचे अधिक नुकसान झाले आहे, मात्र, राज्य सरकारने साधी दखल देखील घेतली नाही. अनिल बोंडे पुढे म्हणाले, या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा. तसेच, कोरोनाच्या काळामध्ये घरगुती वीज बिल माफ करू अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. परंतु, कोरोनाची पहिली लाट ओसरताच महावितरणने निर्दयीपणे सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात केली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आणि आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला. मजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे गोरगरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पत्र लिहा, अशी विनंती अनिल बोंडे यांनी केलीय.

अनिल बोंडे पुढे म्हणाले, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही टाकली नाही. ९४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती महाविकास आघाडी सरकारकडे आहे. या खात्यांत त्यांनी ६००० रुपये टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी पवार साहेबांनी पत्र लिहावे. तसेच, कोरोनामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि दहा हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीने बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. असे पत्र अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना दिले आहे.